पुणे :- पूर्व हवेलीतील कुंजीरवाडी येथील पाटबंधारे विभागाच्या नवीन कालव्या जवळ महावितरण कंपनीचा उच्च क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर असून त्या मधून सातत्याने गरम ऑईल लिकेज होत असल्याने ट्रान्सफॉर्मर जवळील परीसरात धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली असून या ट्रान्सफॉर्मरचा केव्हाही स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्याचबरोबर सदर ट्रान्सफॉर्मरच्या लगत असलेल्या डिस्ट्रीब्यूशन बॉक्सचे झाकणही उघडे असून ते जमिनीपासून केवळ दोन फूट अंतरावर आहे यामुळे त्या परिसरातील लहान मुले, शेतकरी, जनावरे यांचा सहज स्पर्श होवून जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
“दुर्दैवाने अशा परिस्थितीमध्ये भविष्यात जीवित हानी झाल्यास याला जबाबदार कोण…??”
अर्थात या परिसरातील महावितरणचे अधिकारी यांचा निष्काळजीपणा आणि बेजबाबदारपणा याला कारणीभूत असून सदर ठिकाणच्या महावितरण अधिकाऱ्यांनी तात्काळ याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्या ठिकाणी तातडीने दुरुस्ती करून घ्यावी. अशी मागणी येथील नागरिकांनी केलेली आहे.
खरे पाहता ग्रामीण भागामधील ट्रान्सफॉर्मरकडे महावितरणचे दुर्लक्ष होत असून सातत्याने काही ठिकाणी अपघात होत आहेत.
ट्रान्सफॉर्मरची देखभाल दुरुस्ती ही नियमानुसार करणे आवश्यक असते.या आॅईल गळतीच्या प्रकारामुळे वेळच्यावेळी देखभाल दुरुस्ती होत नसल्याची शंका निर्माण होत आहे.. ज्यावेळी एखादा मोठा अपघात होईल अथवा ट्रान्सफॉर्मर पूर्णपणे नादुरुस्त होवून विद्युत पुरवठा खंडित झाल्यावरच महावितरणचे अधिकारी याकडे लक्ष देणार का? अशी चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये मोठ्याप्रमाणात होत आहे.
सुनील टिळे.,सहायक अभियंता, कुंजीरवाडी यांची प्रतिक्रिया…
सदर डीपी गेल्या आठवड्यात बदलली आहे त्या ठिकाणी वायरमनला पाठवून दुरुस्ती करून घेतो.
म.रा.वि. वि. कंपनी मर्या.उरुळी कांचन उपकार्यकरी अभियंता उरुळी कांचन उपविभाग याची प्रतिक्रिया..
ट्रान्सफॉर्मर ऑइल गळती बाबत त्या परिसरातील नागरिकांनी कोणी तक्रार केली आहे का ? त्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याकडून माहिती घेतो