पुणे – तक्रारदार यांना पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ (म्हाडा) तर्फे लॉटरी पद्धतीने घर मिळाले होते. सदर घराच्या जाहिरातीच्या वेळेस अधिकची रक्कम लागेल याबाबत नमूद नसल्याने तक्रारदार यांना सदर सदनिकेचा वाढीव हप्ता भरता आला नाही. त्यासाठी तक्रारदार यांनी सदर सदनिकेचे फेरवितरन होऊन आरटीजीएस चलन मिळण्यासाठी पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ (म्हाडा) पुणे येथे सविस्तर अर्ज दिला होता व तक्रारदार हे त्याबाबत सातत्याने पाठपुरावा करीत होते. तक्रारदार हे म्हाडा, पुणे कार्यालयातील मुख्याधिकारी व कंत्राटी खाजगी इसम अभिजीत जिचकार यांना भेटले असता, त्यांनी तकारदार यांचेकडे सदनिकेचे फेर वितरण होवून आरटीजीएस चलन देण्यासाठी दोन लाख रुपयांची लाचेची मागणी केली असल्याची माहिती तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागास दिली होती.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची पडताळणी दिनांक दि. २१/५/२०२४, दि. २४/५/२०२४, दि. २७/५/२०२४, दि. २९/५/२०२४ व दि.३१/५/२०२४ रोजी पाच वेळा पडताळणी पंचासमक्ष केली असता, आरोपी कंत्राटी खाजगी इसम अभिजीत जिचकार यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांची सदनिका पुन्हा वितरित करुन आरटीजीएस चलन काढून देण्यासाठी लोकसेवक मुख्याधिकारी, म्हाडा, पुणे यांच्याकरीता रु. २,२०,०००/- ची व स्वतः करीता रु. ५०,०००/- ची अशी पंचासमक्ष वाढीव एकुण २,७०,०००/- रुपये पंचासमक्ष लाचेची मागणी केली. कंत्राटी खाजगी इसम अभिजीत जिचकार यांनी तक्रारदार यांचेकडून सदरची २,७०,०००/- रुपये लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारल्यावर कंत्राटी खाजगी इसम अभिजीत जिचकार वय ३४ वर्ष, पद प्रोजेक्ट मॅनेजर (कंत्राटी खाजगी इसम) नेमणुक म्हाडा कार्यालय, पुणे. रा. वाकड, पुणे.यांना दि. ३१/०५/२०२४ रोजी परमार चेंबर येथील स्टेटस फॅमिली रेस्टॉरंट अॅन्ड बार मध्ये, साधु वासवानी चौक, पुणे..येथे सायंकाळी अटक करण्यात आली असून, त्यांचेविरुद्ध बंडगार्डन पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७, ७ अ. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणात ला.प्र.वि. पुणे चे पोलीस निरीक्षक विरनाथ माने पुढील तपास करत आहेत. सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.