हवेली – सध्या जमिनीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत तरी छोट्या मोठ्या कामासाठी नागरिकांना तहसीलदार कार्यालयात सातत्याने जावे लागते. आर्थिक गोष्टीसाठी नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार थांबत नसल्याने नागरिक आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा रस्ता पकडत आहेत.त्यातच हवेली तहसीलदार कार्यालय अंतर्गत येणाऱ्या शेतकरी यांचे मालकीची जमीन पश्चिम चक्राकार मार्गासाठी संपादित होत असून, सदर जमिनीचा नुकसान भरपाई मोबदला म्हणून तक्रारदार ह्यांना रक्कम ३४,२०,३४८/- रुपये सरकारी कार्यालयाकडून मिळणार होती.
तक्रारदाराच्या त्या जागेच्या सात-बारा उता-यावरील पोकळीस्त असलेली नोंद तहसिलदार, हवेली कार्यालयाकडून कमी होणार होती. ती नोंद कमी करण्यासाठी तक्रारदार ह्यांचे प्रकरण तहसिलदार, हवेली कार्यालय येथे प्राप्त झाले होते.
सदर अर्जाची पोकळीस्त नोंद कमी करण्यासाठी लोकसेवक नरेंद्र भानुदास ढोले, वय ४० वर्ष, कुळकायदा अव्वल कारकुन, तहसिलदार कार्यालय, हवेली, पुणे. (वर्ग-३) ह्यांनी तक्रारदार यांचेकडे तहसिलदार यांचेकरीता १,५०,०००/- रुपयाची लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी ला.प्र.वि. पुणे येथे दिली होती.
तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीची पंचा समक्ष पडताळणी दिनांक दि. २०/०२/२०२४ व दि. २०/०३/२०२४ दिं- ०८/०२/२०२४, दि. ०९/०२/२०२४, दि. १४/०२/२०२४, दि. १५/०२/२०२४, रोजी पाच वेळा पडताळणी केली असता, लोकसेवक नरेंद्र ढोले यांनी तक्रारदार यांचेकडे तहसिलदार, हवेली ह्यांचेकरीता १,५०,०००/- रुपये (एक लाख पन्नास हजार रुपये) ची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने वरील भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७, ७ अ.अन्वये खडक पोलीस स्टेशन, पुणे शहर, गु.र.नं. १३७/२०२४ नुसार दिनांक २२/०४/२०२४ रोजी लाच मागणीची गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ला.प्र.वि. पुणे येथील पोलीस उपअधीक्षक माधुरी भोसले तपास करीत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.