हडपसर : मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांची केशवनगर-मुंढवा परिसरात पदयात्रा व बाईक रॅली बुधवारी पार पडली. ग्रामदैवत भैरवनाथाचे सहकुटुंब दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर जगताप यांची पदयात्रा भोसले गार्डन येथे सुरु करण्यात आलेल्या मध्यवर्ती निवडणूक कचेरीपासून सुरु झाली.
भोसलेनगर, मगरपट्टा सिटी, सोलापूर रस्ता, लोहियानगर, मुंढवा, धायरकर वस्ती, मुंढवा गावठाण, केशवनगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पवारवस्ती, कुंभारवाडा, रेणुकामाता मंदिर भोईवस्ती, गोदरेज प्रॉपर्टीज, हनुमाननगर, म्हसोबा वस्ती, ऑरबिज स्कुल, गुरुकृपा सोसायटी, लोणकर वस्ती, आनंदनगर, शिंदेवस्ती या भागातून निघालेल्या पदयात्रेचे नागरिकांनी स्वागत केले.
प्रशांत जगताप यांनी घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकांशी संवाद साधला. ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. माता-भगिनींनी त्यांचे औक्षण करून त्यांना ‘विजयी भव’चा आशीर्वाद दिला. ‘रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी’च्या जयघोषाने परिसरात चैतन्य पसरले होते. महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झाले होते. सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत केशवनगर-मुंढवा परिसरातील नागरिकांच्या भेटी घेत जगताप यांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.
प्रशांत जगताप म्हणाले, “राज्यभरात महाविकास आघाडीला पोषक वातावरण आहे. हडपसरमधील जनतेनेही निष्क्रिय आमदाराला घरी बसवण्याचा निर्णय केला आहे. हडपसरमध्ये परिवर्तन घडणार व स्वाभिमानाची तुतारी जोरात वाजणार, असा विश्वास मतदारसंघात फिरताना वृद्धिंगत होत आहे.”
पदयात्रेत माजी उपमहापौर बंडुतात्या गायकवाड, माजी नगरसेवक योगेश ससाणे, समाजवादी नेते प्रा. सुभाष वारे, शिवसेना उपशहर प्रमुख समीर तुपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे हडपसर विधानसभा अध्यक्ष प्रविण तुपे, काँग्रेसचे हडपसर विधानसभा अध्यक्ष दिलीप तुपे यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे आजी- माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.